जारावंडीच्या जंगलात वाघ आणि तडसचा मुक्त संचार; कॅमेरा ट्रॅपमध्ये दुर्मिळ क्षण कैद

प्रतिनिधी : प्रणित पेदापल्लीवर  

एटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी वनक्षेत्र पुन्हा एकदा समृद्ध वन्यजीवांच्या उपस्थितीमुळे चर्चेत आले आहे. वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघ आणि तडस  या दोन्ही वन्यप्राण्यांचे वास्तव्य स्पष्टपणे दिसून आले आहे. या दुर्मिळ छायाचित्रांमुळे जारावंडीचे जंगल वन्यजीवांसाठी सुरक्षित अधिवास असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

कॅमेरा ट्रॅपमध्ये रात्रीच्या वेळी जंगलातील पायवाटेवरून फिरणारा वाघ, तसेच पहाटेच्या सुमारास अन्नाच्या शोधात फिरणारा तडस कैद झाला आहे. एकाच वनक्षेत्रात या दोन्ही महत्त्वाच्या वन्यप्राण्यांची नोंद होणे ही वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक बाब मानली जात आहे.

वन्यजीव अभ्यासकांच्या मते, वाघाची उपस्थिती ही समृद्ध आणि संतुलित जंगलाचे प्रतीक आहे. तर तडस हा जंगलातील नैसर्गिक स्वच्छता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा प्राणी आहे. त्यामुळे जारावंडी वनक्षेत्रातील जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल आजही अबाधित असल्याचे या नोंदीतून स्पष्ट होते.

वन विभागाच्या माहितीनुसार, कॅमेरा ट्रॅपमधून मिळालेली ही छायाचित्रे वन्यजीवांच्या हालचालींचा अभ्यास, त्यांच्या संवर्धनासाठी नियोजन आणि जंगलातील परिसंस्थेचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. जंगलालगतच्या गावांतील नागरिकांनी वन्यप्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखावे, जंगलात विनाकारण प्रवेश टाळावा आणि कोणत्याही वन्यप्राण्याची हालचाल आढळल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post

Also Read