तालुका प्रतिनिधी :- प्रणित पेदापल्ल्लीवार
पीपली (बुर्गी) कंपनी प्रकल्पावरून ग्रामस्थ आक्रमक;खुल्या चर्चेची मागणी.!
एटापल्ली:- तालुक्यातील जवेली खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पीपली (बुर्गी) परिसरात प्रस्तावित असलेल्या ओम साई राम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पाबाबत स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेतली असून, प्रभावित गावांच्या अटी-शर्ती मान्य करून खुली व पारदर्शक चर्चा करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात परिसरातील ग्रामस्थांनी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची भेट घेऊन निवेदन सादर करत स्थानिकांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
तसेच स्थानिक ग्रामस्थांनी तहसीलदार एटापल्ली यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा पालकमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
कंपनीच्या प्रस्तावासाठी ग्रामसभेचा ठराव मिळविताना काही मोजक्या व्यक्तींमार्फत आर्थिक प्रलोभन देऊन व दिशाभूल करून ग्रामस्थांची फसवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे.
पीपली,बुर्गी,जवेली खुर्द,जिजावंडी,वेलमागड आदी परिसरातील अनेक गावे या प्रस्तावित प्रकल्पामुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे.त्यामुळे स्थानिक रोजगार,पर्यावरण संरक्षण,जमीन व नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण तसेच परिसराचा सर्वांगीण विकास याबाबत ग्रामस्थांनी विविध अटी-शर्ती मांडल्या आहेत.
अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे अधिकारी, प्रशासन आणि प्रभावित गावांतील नागरिक यांची संयुक्त खुली बैठक आयोजित करून सर्व मुद्द्यांवर पारदर्शक चर्चा करण्यात यावी व सर्वमान्य निर्णय घेण्यात यावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी ग्रामस्थांची व्यथा व समस्या ऐकून घेत, आपण स्थानिक ग्रामस्थांच्या सोबत आहोत.प्रभावित नागरिकांच्या न्याय्य मागण्या कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील आणि वरिष्ठ पातळीवर यांचा पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी दिले.
या भेटीनंतर पीपली (बुर्गी) परिसरातील प्रस्तावित कंपनी प्रकल्पाबाबत ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढल्या असून, आता प्रशासन व कंपनीकडून प्रभावित गावांच्या मागण्यांबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी पीपली येथील सचिन लेकामी, पुरुषोत्तम हेडो,दिलीप लेकामी,नानसू हिचामी, पेका लेकामी मधुकर मट्टामी, संदीप लेकामी,भिवा पदा,रणजित लेकामी, प्रवीण लेकामी,बुर्गी येथील अजित नरोटे,विनोद पदा,अब्बू नरोटे, गणेश नरोटे,जिजावंडी येथील सत्तू तुमरेट्टी, सदाशिव तुमरेट्टी, मंगेश नरोटे, जवेली खुर्द येथील किशोर नरोटे, नागेश गोटा, नरेश दुर्वा,नितेश गोटा हे उपस्थित होते.

.jpeg)