मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी विशेष व्यवस्था करा.

तालुका प्रतिनिधी:प्रणित पेदापल्ल्लीवार  


SIR प्रक्रियेनंतर नावांसह तपशिलांत चुका; भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार यांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

 

अहेरी:-  SIR प्रक्रियेनंतर प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीमध्ये अनेक मतदारांच्या नावांसह पत्ता, वय, लिंग व अन्य तपशिलांत मोठ्या प्रमाणात चुका आढळून येत आहेत. या त्रुटी तातडीने दूर करण्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर व्यवस्था उभारावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार यांनी केली.यासंदर्भात संतोष मद्दीवार यांनी अहेरीचे उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ साहेब यांच्याकडे निवेदन सादर करून मागणी केली.


SIR प्रक्रियेनंतर मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी बहुतांश मतदारांनी अद्याप आपली नावे व त्यावरील तपशील तपासलेले नाहीत. ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक अल्पशिक्षित नागरिकांना मतदार यादीतील नाव कसे तपासायचे, तसेच चूक आढळल्यास ती दुरुस्त कशी करायची, याची माहिती नसल्याचे संतोष मद्दीवार यांनी निवेदनातून निदर्शनास आणून दिले.


गावागावांत जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी


मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी केवळ ऑनलाइन सुविधा पुरेशी नसून गावागावांत विशेष शिबिरे घेऊन नागरिकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करावे. प्रत्येक मतदाराला आपले नाव, पत्ता, वय, लिंग व इतर तपशील तपासण्याची संधी देऊन त्रुटींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.


मतदार ओळखपत्राला आगामी काळात महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता असल्याने त्यावरील माहिती अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. मतदार यादीतील चुका वेळीच दुरुस्त न झाल्यास भविष्यात नागरिकांना अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन विशेष दुरुस्ती अभियान राबवावे, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली.


यावेळी भाजप अहेरी तालुकाध्यक्ष विकास तोडसाम, श्रीनिवास मगडीवार, अजय ठाकरे, सिद्धेश सिडाम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Also Read