प्रतिनिधी :- प्रणित पेदापल्लीवर
वेगळ्या फिडरची ५० गावांची एकमुखी मागणी; अवघ्या तीन लाईनमनवर संपूर्ण परिसराचा भार
एटापल्ली :- गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जारावंडी परिसरातील नागरिकांना तब्बल तीन दिवस अंधारात राहावे लागले. २९ जुलै रोजी रात्री नेमक्या ८ वाजता जारावंडी भागातील वीजपुरवठा खंडित झाला. गडचिरोली ते जारावंडी हे सुमारे ७० किलोमीटरचे अंतर घनदाट जंगलातून असल्याने वीजवाहिन्यांमध्ये वारंवार बिघाड होत असल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, ३० जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता पेंढरी येथे वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र जारावंडी परिसरासाठी स्वतंत्र फिडर नसल्यामुळे या भागाला थेट वीजपुरवठा मिळू शकला नाही. जारावंडीसह सुमारे ५० गावांचा वीजपुरवठा ढोरकट्टा रेच्या लाईनवर अवलंबून असून, त्या मार्गावरील सात ते आठ वीजखांबांवरील तारा तुटल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला.
सलग तीन दिवस जारावंडीसह ५० गावांमध्ये वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. मोबाईल नेटवर्क, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले.
दरम्यान, जारावंडीतील काही ग्रामस्थ पेंढरी येथे पोहोचले असता वीज विभागाकडे हेल्परची कमतरता असल्याचे समजले. त्यानंतर गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत वीज कर्मचाऱ्यांना मदतीचा हात दिला. मुसळधार पाऊस, चिखल, जंगलातील कठीण परिस्थिती आणि पूरस्थितीचा सामना करत लाईनमन व ग्रामस्थांनी एकत्रितपणे तुटलेल्या वीजवाहिन्या दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले.
अखेर सलग प्रयत्नांनंतर रात्री सुमारे ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान जारावंडी परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. तीन दिवस अंधारात राहिलेल्या नागरिकांनी त्यानंतर सुटकेचा निःश्वास सोडला.
विशेष म्हणजे, जारावंडी परिसरातील सुमारे ५० गावांच्या वीजपुरवठ्याची जबाबदारी केवळ तीन लाईनमनवर असल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या आणि दुर्गम जंगल परिसरात मुसळधार पावसात वारंवार बिघाड होत असताना अत्यल्प मनुष्यबळावर काम करावे लागत असल्याने दुरुस्तीला विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, जारावंडी परिसरासाठी मंजूर करण्यात आलेल्या स्वतंत्र वीज फिडरचे काम पूर्ण होऊन अनेक दिवस उलटले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अद्यापही या फिडरवरून वीजपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. सर्व पायाभूत सुविधा पूर्ण असतानाही हा फिडर कार्यान्वित न झाल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. "स्वतंत्र फिडरचे काम पूर्ण झाले असताना तो अद्याप सुरू का करण्यात आला नाही?" असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ग्रामस्थांच्या मते, हा फिडर वेळेत सुरू झाला असता तर जारावंडीसह ५० गावांना तीन दिवस अंधारात राहण्याची वेळ आली नसती.
या पार्श्वभूमीवर जारावंडी परिसरातील नागरिकांनी शासन व महावितरणकडे जारावंडीसाठी स्वतंत्र वीज फिडर तातडीने कार्यान्वित करावा तसेच या भागात अतिरिक्त लाईनमन व हेल्परची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी केली आहे
मुसळधार पावसात जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत असले, तरी भविष्यात अशा प्रकारे ५० गावांना अंधारात राहावे लागू नये, यासाठी स्वतंत्र फिडर तातडीने सुरू करणे आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे," अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

.jpeg)