तालुका प्रतिनिधी : प्रणित पेदापल्लीवर
दुःखाच्या प्रसंगी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची माणुसकीची साथ
अहेरी : अहेरी तालुक्यातील राजाराम (खांदला) येथील जीवन सखाराम अर्का (वय २८) यांचे कावीळ (पीलिया) या आजाराने उपचारादरम्यान २१ ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, एकुलता एक मुलगा गमावल्याने अर्का कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे.
या दुःखद प्रसंगी माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी अर्का कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत तेरवी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत पाठविली. भाजप अहेरी तालुका अध्यक्ष विकास तोडसाम आणि भाजप जिल्हा सचिव अभिजित शेंडे यांच्या माध्यमातून ही मदत कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यात आली.
जीवन अर्का हे आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर मोठे दुःख कोसळले आहे. या कठीण प्रसंगी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दूरध्वनीद्वारे अर्का कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या दुःखाची आस्थेने विचारपूस केली.
जीवन अर्का यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला. तसेच या कठीण प्रसंगात कुटुंबीयांनी खचून जाऊ नये आणि भविष्यात कोणत्याही प्रकारची मदत आवश्यक असल्यास आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे आश्वासन दिले.
दुःखाच्या प्रसंगी राजकारणापलीकडे जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी घेतल्याचे या मदतीतून दिसून आले. संकटाच्या काळात गरजू कुटुंबाला आधार देणे, त्यांच्या दुःखात सहभागी होणे आणि शक्य ती मदत करणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
जीवन अर्का यांच्या अकाली निधनाने राजाराम परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अर्का कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
